जय गजानन
संत गजानन भक्त परिवार ---एक वटवृक्ष
संस्थापक,आधारवड ----श्री .शशिकांत पोकळे दादा
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा:।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।।
२१ जानेवारी २००८ रोजी संत गजानन भक्त परिवाराची स्थापना करून महाराजांच्या चरित्राचे जगभरात वाचन व्हावे यासाठी निस्वार्थपणे कार्य करणारे तसेच महाराजांच्या विविध उपासनांचा जगभर प्रचार व प्रसार करणारे आणि जागतिक पारायण, कारागृहात पारायण, महापारायणासारख्या अद्भुत फलदायी संकल्पना मांडून अत्यंत सहजपणे सत्यात उतरवून पूर्णत्वास नेणाऱ्या आपल्या आदरणीय श्री शशिकांत पोकळे दादांचा हा परिचय व जीवनप्रवास..... ग.म. भक्त शशिकांत पोकळे दादांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील 'मालखेड' या खेडेगावी एका गरीब परंतु अध्यात्माची आवड असलेल्या कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा श्री. किसनराव पोकळे नेहमी भजन कीर्तन करायचे, म्हणून त्यांना गावात आजही "हरी भजने" म्हणूनच ओळखले जाते. आजोबांसोबत राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज दादांच्या घरी कधी कधी येत असत. १९६२ साली दादांच्या घरी महाराज गेले असता दादांना उचलून घेऊन ह्या मुलाला " मी ह्याच्या वयाच्या ५० व्या वर्षानंतर पूर्णपणे अध्यात्माकडे नेईन" अशी भविष्यवाणी तुकडोजी महाराजांनी केली होती. दादांनी बालपणी अत्यंत खडतर प्रवास करून जीवन व्यतीत केले दादांचे आठव्या वर्गापर्यंतचे शिक्षण गावातील सरकारी शाळेत आणि त्यानंतर चांदुर रेल्वे तसेच अमरावतीचे ब्रिजलाल बियाणी कॉलेज येथे झाले. आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे त्यांनी लहानपणापासूनच शेतीची कामे केली. शिकत असताना बरेचदा त्यांनी मालखेडहून 18 किलोमीटर अमरावतीला पायपीट ही केली. शिक्षण घेता घेता त्यांनी काही दिवस अमरावतीच्या 'थ्री ब्रदर्स ' या दुकानात सहा रुपये रोजंदारी ने नोकरी केली. कष्टाची तयारी असली की सर्व साध्य होते. "कष्टेविण फळ नाही " हे लहानपणापासूनचे जणू ब्रीदच होते दादांचे ! "शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी" या उक्तीप्रमाणे निस्सीम गजानन भक्त असणाऱ्या आई-वडिलांचे दादा म्हणजे मधुर रसाळ फळंच!! गजानन महाराजांच्या भक्तीचे बाळकडू त्यांना आईनेच पाजले. ग्रंथातील लीलांचे वर्णन कथा रूपात सांगून तिने महाराजांच्या " भक्तीतील शक्तीचे " महत्व दादांना समजावून सांगितले. त्यामुळे दादांना पण महाराजांच्या भक्तीची ओढ लागली. त्यांनी महाराजांना मनोमन आपले गुरु मानले. वयाच्या नवव्या वर्षापासूनच गजानन विजय ग्रंथाचे वाचन आणि २१ अध्यायांचे संपूर्ण पारायण महाराजांच्या कृपेने त्यांनी करायला सुरुवात केली. शिवाय गुरुमाऊलींच्या दर्शनासाठी शेगावला जाणे नियमित चालूच होते. दादांना लहानपणापासूनच भजन गायनाचा छंद होता. त्यांना भजन स्पर्धेमध्ये अनेक पारितोषिके देखील मिळाली होती. १९६९ मध्ये अमरावती जिल्ह्यातील ";शांतीकुंज आश्रमात " महाशिवरात्रीच्या कार्यक्रमात भजन स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळविल्यानंतर येथील संत श्री. खप्ती महाराज यांनी दादांना जवळ घेऊन, " तू अध्यात्मात नाव कमावशील " असा आशीर्वाद दिला. जो आज सार्थ व परिपूर्ण झाल्याचे आपण सर्वच अनुभवत आहोत. दादा एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जायचे त्यांचे त्यांच्या शिक्षकांशी व प्राध्यापकांशी आजही पारिवारिक जिव्हाळ्याचे सौहार्दपूर्ण नातं टिकून आहे. दादांनी सर्व नाती आपुलकीने जोपासलेली आहेत. दादांचे इंजिनिअरिंग चे एमटेक आणि मॅनेजमेंट एमबीए चे शिक्षण नागपूर येथे नावाजलेल्या संस्थांमध्ये झाले. १९८५ पासून २०११ पर्यंत दादांनी सिंघानिया ग्रुप, आदित्य बिर्ला ग्रुप, जर्मन कंपनी बायर यासारख्या जगप्रसिद्ध कंपन्यांमध्ये उच्च पदांवर काम कार्य केले. दादांना दोन्ही गोष्टी खुणावत होत्या. त्या दोन्हींचा म्हणजे उच्च पदावरील नोकरी आणि कौटुंबिक आर्थिक जबाबदाऱ्या व दुसरीकडे महाराजांची निष्काम सेवा व परमभक्ती याचा मेळ दादांनी सुरेख साधलाय. त्यांच्या जीवनातील काही वेचक व मार्मिक सूचक प्रसंग जेव्हा महाराजांनी त्यांचे सर्वतः रक्षण केले; प्रेरणा दिली व संत गजानन भक्त परिवाराची बीजे पेरली ती इथे देत आहे. २००५ -०६ वर्षात दादा ' बायर ' या जर्मन कंपनीत उच्च पदावर कार्यरत होते त्यावेळी साधारण जून नंतर ते वर्ष अखेर या कालखंडात दादांना स्वप्नात एक दिगंबर पुरुष दिसे व सूचक सल्ला देई... ते म्हणजे " या व्यावहारिक जगातून बाहेर पड... मुक्त हो " ही व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही तर महाराजच होते. महाराजच दादांना पदोपदी दर्शन देऊन " माझे कार्य कर ;भक्ती कर " असे सूचवित होते पण संसार, कौटुंबिक जबाबदाऱ्या ,आई-वडिलांची सेवा , कन्यांची शिक्षणं इत्यादी सर्व गोष्टी कशा घडतील ? या चिंतेने दादा पूर्णवेळ झोकून महाराजांचे काम करू शकत नव्हते व ह्या गोष्टीचे दादांना नेहमी वाईट वाटत होते.. पण विशेष प्रसंगी अर्थात घरातील कोणाचा वाढदिवस व लग्नाचा वाढदिवस या विशिष्ट दिवशी दादा हमखास पारायण करीतच होते. दादांची महाराजांवर नितांत श्रद्धा व विश्वास होताच पण आध्यात्मिक प्रगती साधताना कौटुंबिक जबाबदारी यातून दादांना पूर्ण वेळ देणे शक्य होत नसे. अनेक कौटुंबिक आर्थिक संकटांना तोंड देताना " महाराज सर्व ठीक करतील " हा विश्वास तर होताच असाच एक प्रसंग एकदा दादांच्या मातोश्री खूप आजारी पडल्या. त्यांना १४ दिवस अतिदक्षता विभागात ही ठेवले होते त्यावेळी नोकरीतून सुट्टी, आर्थिक ओढाताण सर्व बाबी केवळ महाराजांच्या कृपाप्रसादानेच त्यांनी निभावून नेले. डॉक्टरांनी आता तुम्हाला वापीत राहता येणार नाही असे असे सांगितल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली व पुढे वलसाडजवळ दुसरी स्थायी स्वरूपाची नोकरी त्यांना सहज मिळाली, कारण उच्चविद्याविभूषित व आपल्या कार्यक्षेत्रात अत्युच्च कार्य करणारे उत्तम परफॉर्मर असल्याने उत्तमोत्तम बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये त्यांना संधी मिळाल्या. " गुरुविण कोण दाविल वाट..." या उक्तीचा दादांनी पदोपदी अनुभव घेतला आहे. अपार श्रद्धास्थान असलेले आपले गुरुमाऊली प्रत्येक खडतर प्रसंगातून आपल्याला वाट तर दाखवतातच.. शिवाय सूचक स्वप्नामधून उपायही ते सूचवितात. २००८ झाली नोकरी करताना दादांच्या कामात खूप व्यत्यय, अडचणी निर्माण होऊ लागल्या महाराज कठीण प्रसंगी आपल्याला तारून नेतात व खऱ्या सच्च्या भक्ताला संकटातून वरचेवर अलगद झेलून घेतात असाच हा दादांच्या आयुष्यातील प्रसंग.... २००८ च्या दिवाळीच्या सुमारास दादा कंपनी कॅम्पसमध्ये एका मोठ्या बंगल्यात वास्तव्यास असताना त्यांचे घरी जबरी दरोडा पडला. सोनं-नाणं, पैसे, मोबाईल सर्वकाही लुटून नेले होते. घरात सहा असून सुद्धा कुणालाच काही कळले नाही. विशेष म्हणजे ह्या कंपनीच्या कॉलनीत अत्यंत कडक सुरक्षा बंदोबस्त होता गेल्या साठ वर्षांच्या काळात कधीही असा चोरी चा प्रकार घडला नव्हता .म्हणजे .." न भूतो न भविष्यति..." अशी वेळ दादांच्या परिवारावर आली होती. कदाचित महाराज परीक्षा घेत असतील. हे मात्र बरे की फक्त.. आणि फक्त.. महाराजांच्या कृपेने कोणाला काही शारीरिक इजा न होता सर्वजण सुखरूप पणे या संकटातून बाहेर पडले. ते केवळ महाराजांच्या कृपाशीर्वादा मुळेच !! याप्रसंगी दादांना जणू "जाको राखै साईयां , मारि न सके कोय" याची प्रचीतीच आली ! अशा अनेक प्रसंगातून धीराने तोंड देत दादांचे कार्य सुरू होते. वारंवार सूचक स्वप्ने दाखवून महाराज दादांना पूर्णवेळ भक्तीचे संकेत देत होते पण आई वडिलांचे शारीरिक स्वास्थ्य, कौटुंबिक जबाबदाऱ्या अशा एक ना अनेक कारणांमुळे दादांनी नोकरी सोडण्याचा निर्णय दादा घेऊ शकले नाही. विशिष्ट प्रसंगी पारायण व नियमित वाचन ही उपासना चालूच ठेवली होती. " महाराजांवरील नितांत श्रद्धेने सर्व ठीक होईल" या विश्वासाने दादांनी एक - दोन नोकर्या बदलल्या. अशा प्रसंगातून दादांचे गुरुवारी व विशिष्ट प्रसंगी पारायण करणे सुरू होते. साधारण चार तासात पूर्ण पोथीचे २१ अध्यायाचे पारायण त्यांचे होत असे. एकदा दादांना पारायण करत असतांना एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये जाण्याचे सांगण्यात आले. तेव्हा पारायण कसे पूर्ण करायचे असा प्रश्न असताना पत्नी व मुलींसोबत दादांनी पारायण सामुहिक रित्या पूर्ण केले व अशा अनेक अडथळ्यांवर उपाय म्हणून एकट्याने गुरुवारी पारायण न करता भक्तांच्या संपर्कात येऊन जर भक्त जोडले तर इतरांनाही भक्तीचा व महाराजांच्या सेवेचा लाभ घेता येईल या उद्देशाने भक्तांशी संपर्क करणे दादांनी सुरू केले. फोन, ई-मेलद्वारे भक्तांशी संपर्क करू लागले.भक्त शोधून कसेतरी प्रथम तेरा जण जमले आठ जणांनी दोन -दोन अध्याय वाचून २१ अध्याय पूर्ण करून पारायण पूर्ण होऊ लागले. हीच ती गुरुवार पारायणाची सुरुवात हळूहळू जनसंपर्क वाढत गेला .पहिले एक-दोन आठवडे असेच पारायण सुरु होते मग काही कालानंतर दोन-तीन महिन्यांनी काही भक्त जोडले गेले असे " धागे धागे गुंफता....." ४ – ६ महिन्यानंतर दुसरा ग्रुप तयार झाला. याच दरम्यान परदेशी भक्तांशी संपर्क होऊन याहूवर " संत गजानन भक्त परिवाराची " स्थापना झाली. हळूहळू संपर्क वाढत होता. महाराजांच्या भक्तांची कमी नव्हतीच फक्त त्यांना एकत्र आणणे व एका भक्तीच्या धाग्यात गुंफून संत गजानन भक्त परिवाराची माळा तयार करणारे आपले आदरणीय दादाच संस्कृत मध्ये म्हणतात ना " योजकस्तत्र दुर्लभः । " म्हणजे " योजना करणारा दुर्लभ असतो" तसेच आपले पोकळे दादा.. यांच्या जनसंपर्कातून अथक परिश्रमातून महाराजांच्या सतत प्रेरणेतून २१ जानेवारी २००८ रोजी आपल्या " संत गजानन फक्त परिवाराची " स्थापना आदरणीय गजानन महाराज भक्त शशिकांत पोकळे दादांनी केली. या संत गजानन भक्तपरिवार स्थापनेमागचा मूळ हेतू हाच की जगभरातील गजानन महाराजांचे भक्त एका धाग्याने बांधले जावेत व त्यांच्या भक्तीतून व पारायण रुपी साधनेतून गजानन भक्तांची माला तयार व्हावी व श्रद्धापूर्वक महाराजांच्या चरणी समर्पित व्हावी. आज आपण सर्वजण महाराजांच्या आशीर्वादाने व दादांच्या प्रेरणेने एकत्र बांधले गेलो आहोत जसे की एक परिवारच !! " वसुधैव कुटुम्बकम्...." या उक्तीप्रमाणे संपूर्ण जगभरातील महाराजांचे भक्त दादांनी आपल्या परिवारात जोडले आहेत. संत गजानन भक्त परिवारात लहानांपासून वृद्धांपर्यंत भक्त सामील आहेत व 'जय गजानन !' "गण गण गणांत बोते" म्हणत एकमेकांशी बांधले गेलेत! २००८ साली लावलेल्या संत गजानन भक्तपरिवार रुपी 'बीजाचा ' आज " वटवृक्ष " झाला आहे व त्याची पाळेमुळे जगभर चांगलीच फोफावत आहेत. " निस्वार्थ, निरपेक्ष, नि:शुल्क, निष्काम, नियमित उपासना व गुरुसेवा हा त्या पाठीमागचा मुख्य हेतू आहे " जास्तीत जास्त सेवा करत राहणे तेही फळाची कोणतीही अपेक्षा न ठेवता जसे कृष्ण अर्जुनाला गीता उपदेश करतो " कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन....." याच भावनेने आपण महाराजांच्या सेवेत आपली पारायण रूपी पुष्पे आणि इतर उपासना महाराजांच्या चरणी निरंतर अर्पण करीत असतो. कार्येषु भाग्यलक्ष्मी-: गजानन महाराज भक्त दादांविषयी अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. हर्षाताई पोकळे यांची दादांना या सर्व कामात असणारी निरंतर, अखंड व कणखर साथ.... जीवनात आलेल्या बऱ्यावाईट सर्व प्रसंगी दादांच्या सोबत त्या असतात व आजही पूर्णतेने महाराजांच्या सेवेत दादा असताना त्याही दादांसोबत आहेतच. महाराजांचा त्यांना वरदहस्त आहे .जणू त्याचाच संकेत म्हणून की काय की... दादांचा विवाह हर्षाताईशी १९९० साली महाराजांच्या " प्रकट दिनी " म्हणजे ' माघ वद्य सप्तमी दिनी ' मध्ये ठरला. हा एक सुवर्णकांचन योगच नाही का.... खऱ्या अर्थाने सहधर्मचारिणी पत्नी व संत गजानन भक्त परिवाराच्या माऊलींची दादांना समर्थ साथ व सहकार्य लाभते आहे. २००८ मध्ये संत गजानन भक्त परिवाराची स्थापना करून दादांनी महाराजांच्या संकेतानुसार व आज्ञेनुसार २०११ असि. व्हाईस प्रेसिडेंट ही उच्च पदावरील आपली नोकरी सोडून पूर्णपणे गजानन महाराजांच्या सेवेला वाहून घेतले. धन्य तो गुरु आणि धन्य तो भक्त!! संत गजानन भक्तपरिवार स्थापना उद्देश----- " निष्काम सेवा परमो धर्मः " याला अनुसरून दादांनी जगभरातील लाखो गजानन महाराजांच्या भक्तांना एकत्र घेऊन उपासना करता यावी या निस्वार्थ, निरपेक्ष, नि:शुल्क, निष्काम, नियमित उपासना व गुरुसेवा व सकारात्मक ऐक्य भावनेतून महाराजांच्या संकेतानुसार २१ जानेवारी २००८ रोजी या " संत गजानन भक्त परिवाराची" स्थापना केली. आज घडीला परिवाराच्या १२ उपासना वर्षभर नियमित सुरु असतात. भक्तीमध्ये पैशाची गरज नाही, कुणालाही पैसा मागू नका, चांगलं काम हाती घ्या, शुध्द अंत:करणाने केलेली सेवा महाराजांपर्यंत नक्की पोहचते. महाराजांना भक्तांकडून काहीच नको फक्त शुद्ध भाव हवा असे विचार दादा सांगतात आणि संत गजानन भक्त परिवाराच्या कार्यात ह्या विचारांचे काटेकोरपणे पालन करतात . म्हणूनच आपला संत गजानन भक्त परिवार उत्तरोत्तर प्रगती करता करता लाखो भक्तांना प्रेमाने जोडून या परिवाराची अखंड वाटचाल सुरू आहे. त्याचेच पुढचे पाऊल म्हणजे या परिवाराची आज " वेबसाईट आणि एप " तयार होते आहे. त्या माध्यमातून परिवाराची, परिवारा द्वारे घडणाऱ्या सर्व उपासना यांची माहिती जगासमोर येणार आहे .आजच्या तंत्रज्ञान युगातील हे वरवर दिसायला सोपे वाटणारे पण तितकेच परिश्रमपूर्वक काम आहे. दादांनी या परिवाराची स्थापना करून आपल्याला वेगवेगळ्या १२ प्रकारच्या उपासना दिल्या की आपण सर्व भक्त वेळोवेळी पूर्णत्वास नेतो. यासाठी आपण सर्व भक्त महाराजांचे व दादांचे ऋणी आहोत. या आपल्या परिवाराचे शिवधनुष्य दादांनी समर्थपणे पेलले आहे. दादा स्वतः कधीही स्वतःचा परिचय देत नाहीत. केवळ " संत गजानन भक्त परिवार” हीच माझी ओळख ! " असे सांगतात .आज आपण सर्व या परिवारातील सदस्य आहोत ही आपली पूर्वजांची पुण्याई व सत्कर्माचे फळ आहे . " भाग्यवान मी या परिवारी " म्हणत जास्तीत जास्त सेवेचा लाभ आपण सर्वांनी घेऊ या तरच दादांच्या पर्यायाने महाराजांचा या पाठीमागचा हेतू सफल संपूर्ण होईल. दादांच्या रुपाने , मुखाने महाराज आपल्याशी बोलतात असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. जय गजानन!!
सौ. सुप्रिया भाटे, सातारा
संत गजानन भक्त परिवार
जय गजानन
काल एका संयोजिका भगिनीचा (नम्रता भोळे ताईचा) फोन आला. त्यांनी सांगितले की गुरुवार पारायणाची उपासना त्यांच्या ग्रुपमधील सगळ्यां भक्तांना खूपच आवडली. आठवड्यातून एकदाच फक्त १५ ते २० मिनिटे मनोभावे महाराजांची उपासना करण्याची हि पद्धत एकदम सुटसुटीत आहे आणि ह्या उपासनेत शिस्त हि पाळलीच पाहिजे असा माझा भक्तांना व संयोजकांना आग्रह असतो. काही मोजक्या लोकांना हे नियम जाचक वाटतात. परंतु जास्तीत जास्त भक्त ह्या नियमांना धरून चालतात. नम्रताताईने विचारले की ह्या गुरुवारच्या पारायणाची संकल्पना कशी अस्तित्वात आली आणि त्याची सुरुवात कधी झाली हि सर्व माहिती मिळाली तर फारच छान होईल. म्हणून थोडक्यात हि माहिती इथे देत आहे. माझी आई गजानन महाराजांची भक्ती करायची म्हणून साहजिकच मला पण महाराजांच्या भक्तीचा लळा लागला. अगदी चौथ्या वर्गात असतांना पासून श्री विजय ग्रंथाचे पारायण मी करायचो. त्यावेळी ७ ते ८ तास मला लागत असत. नंतर हळूहळू हि वेळ कमी होत गेली. शिक्षण घेतांना व नोकरीला लागल्यानंतर नियमित पारायण करायचो. आता ४:१५ तास लागत असत. महाराजांच्या कृपेने बायको पण महाराजांची भक्ती करणारी मिळाली. (आमचे लग्न महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी ठरले हा ही एक मोठा योगायोगच म्हणावा लागेल). नोकरीमध्ये असतांना काही काळपर्यंत नियमित पारायण करण्यात काही अडचण भासली नाही. परंतु २००२ नंतर नोकरीमध्ये खूप मोठमोठ्या जबाबदाऱ्या महाराजांच्या कृपेने मिळाल्या आणि नियमित पारायण करणे थोडे कठीण होऊ लागले. तरी पण प्रकटदिन, संजीवन समाधीदिन गुरुपुष्यामृत अशा योगावर पारायण करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीत होतो. श्री गजानन विजय ग्रंथाचे नियमित पारायण आपल्याकडून नियमित घडतच रहावे असे नेहमी वाटायचे. परंतु बहुराष्ट्रीय कंपनीतिल नोकरीच्या अधिक जबाबदारीमुळे दिवसेंदिवस ते कठीण होऊ लागले. त्यामुळे मनाची नेहमी घालमेल होत होती. मनातल्या मनात महाराजांना नेहमी विनवणी करायचो की काहीतरी मार्ग सुचवा जेणेकरून नियमित कमित कमी गुरुवारी तरी श्री गजानन विजय ग्रंथाचे वाचन व्हावे. परंतु कसे? ते सुचत नव्हते. एक गोष्ट येथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे आमच्या घरी सर्वच जण विजय ग्रंथाचे वाचन/पारायण करतात. एका गुरुवारी माझी पारायण करण्याची इच्छा होती आणि ठरले देखील होते परंतु त्याच दिवशी दिवसभर खूप महत्वाच्या मिटींग्स ठरल्या. पारायण करून ऑफिसमध्ये जाऊन मिटींग्स करणे शक्य दिसत नव्हते आणि पारायण झाले पाहिजे अशी फार इच्छा होती. मग मी माझ्या मुली व पत्नीशी बोललो आणि सांगितले आज आपण सर्व जण मिळून पारायण करू या आणि त्या सर्वांनी लगेच होकार दिला. आम्ही अध्याय ठरवून घेतले आणि चौघांनी मिळून त्या गुरुवारी पारायण पूर्ण केले. मात्र प्रत्येकाला आपण पारायणात भाग घेतल्याचं समाधान मिळालं. त्यानंतर आम्ही तशी दोन सामुहिक पारायणे केलीत. त्याच वेळी असा विचार मनात आला की २१ भक्तांनी मिळून जर दर गुरुवारी एक अध्याय वाचून पारायण पूर्ण केले तर प्रत्येकाला पारायणाचा लाभ मिळेल आणि पारायण केल्याचे समाधान पण मिळेल. दुसरे असे की महाराजांच्या भक्तांना एका मंचावर एकत्र आणता आले तर किती चांगले होईल असे मला नेहमी वाटत असे. त्या दृष्टीने मी बर्याच भक्तांसोबत संपर्क वाढविला होता. (त्यावेळी फक्त फोन आणि E mail हीच साधने होती) जानेवारी २००८ मध्ये मी याहू ग्रुप वर संत गजानन महाराज भक्त परिवाराची (त्यावेळी हे नांव – GajananShegaonBhaktPariwar असे होते) स्थापना केली आणि भक्त जुळत गेले. त्यावेळी तसे फार कमी भक्त होते. आज संत गजानन महाराज भक्त परिवारामध्ये लाखो भक्त जुळले आहेत २००८ मध्ये काही समविचारी भक्तांशी बोलून आमच्या घरच्या सामुहिक पारायणाची पद्धत मी त्यांना सांगितली आणि सोबतच गुरुवार पारायणाची संकल्पना ही मांडली. त्यावेळी भक्तपरिवारातील बहुतेक भक्त नोकरीपेशा होते त्यामुळे पूर्ण पारायण करणे जमत नव्हते. महाराजांनीही ही उपासना त्यांना मान्य असल्याचे संकेत दिले. काही काळाने १३ भक्त जुळले आणि ठरले की सगळे मिळून दर गुरुवारी एक पारायण पूर्ण करायचे. ह्यामध्ये आम्ही चौघांनी प्रत्येकी २ ह्याप्रमाणे ८ अध्याय वाचण्याची तयारी दर्शवली. आणखी चार भक्तांनी दोन दोन अध्याय वाचनाची तयारी केली आणि अशा प्रकारे गुरुवार पारायणाचा पहिला ग्रुप सुरु झाला. त्यावेळी अध्याय वाचल्याचे कळविण्याचा मार्ग म्हणजे E mail आणि फोन. परंतु भक्त कमी असल्यामुळे सर्व व्यवस्थित पणे चालत होते. साधारण दीड वर्ष एकच ग्रुप होता. त्यानंतर आणखी काही भक्त जुळून दोन ग्रुप तयार झाले. २०१३ नंतर हळू हळू परंतु नियमित ग्रुप तयार होत गेले. आज महाराजांच्या आशीर्वादाने व भक्तांच्या उस्फुर्त प्रतिसादाने गुरुवार पारायणाचे ४५१ ग्रुप आहेत. ९४०० पेक्षा जास्त भक्त एकदम शिस्तबद्ध रितीने गुरुवार पारायणात आपला सहभाग नोंदवतात. वाटसअपच्या तंत्रज्ञानाची आणि अध्यात्माची अतिशय सुंदर सांगड घालण्याचा हा अतिशय फलदायी प्रयोग आहे. ठरलेल्या नियमांप्रमाणे केली तर ही उपासना भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी आहे असा बर्याच भक्तांचा अनुभव आहे . असा आहे गुरुवार पारायणाचा प्रवास. गुरुवार पारायण उपासनेची सेवा अशीच अखंड चालू राहो आणि जास्तीत जास्त भक्तांना ह्या उपासनेचा लाभ घेता यावा ह्या करिता महाराजांच्या प्रत्येक भक्ताने प्रयत्न करावा हि आग्रहाची विनंती.
|| गण गण गणांत बोते ||
|| पाठीशी असता गजानन गुरु, व्यर्थ मी चिंता कशाला करू ||
दि १ जुलै २०१७
टिप – आत्ता गुरुवार पारायणाचे ४८२१ पेक्षा जास्त ग्रुप्स आहेत*
जय गजानन !
श्री गजाननविजय ग्रंथ हा एक सामर्थ्य शाली ग्रंथ आहे. श्री गजाननाच्या भक्तांच्या जीवनातील कोणतीही समस्य सोडवण्याचे सामर्थ्य “ श्रीगजाननविजय ग्रंथ” वाचनामध्ये आहे. संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले तर त्वरित आपल्याला इष्ट फळ मिळते असा भक्तांचा अनुभव आहे. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन, एकदातरी पारायण करा विजय ग्रंथाचे. श्रीगजाननविजय ग्रंथाचा प्रत्येक अध्याय आपले वेगवेगळे प्रोब्लेम दूर करण्याचे सामर्थ्य प्रदान करतो.श्री गजाननविजय ग्रंथाचा कोणता अध्याय कधी वाचावा हे येथे देत आहे.
टिप: विजय ग्रंथावर आधारित ही माहीती महाराजांच्या प्रेरणेने खुप वर्षाआधी मी तयार केलेली आहे. व ती फेसबुकवर उपलब्ध आहे. काही लोक माझे नांव डिलिट करुन ही माहिती पोस्ट करित आहे. तुम्ही जर गजानन महाराजांचे भक्त असाल तर असे करु नये ही विनंती.
अध्याय १
निराशा, मन:शांती, कर्जमुक्ती, नवीन उपक्रमाची सुरुवात करण्यापुर्वी.
अध्याय २
कुटुंबातील व्यथा आणि अडचणी दुर व्हाव्यात म्हणुन.
????अध्याय ३
दुसर्याचे मन जाणतेपणी किंवा अजाणतेपणी दुखावल्या गेले असेल तर, कुणी जवळचे आजारी असेल आणि डॉक्टरांनी हात टेकले असतील तर नक्की वाचावा.
अध्याय ४
जीवनातील दुख आणि समस्या कमी होण्यासाठी.
अध्याय ५
दुष्काळ, पाण्याची समस्या, तहान लागलेली असेल व पाणि जवळ नसेल तर , गेलेली संपत्ती परत यावी म्हणुन, जीवनात सकारात्मक बदल व्हावे म्हणुन.
अध्याय ६
हा अध्याय वाचल्याने चांगले विश्वासू मित्र मिळतील, चांगल्या वाईट मधील फरक कळेल.
अध्याय ७
हा अध्याय वाचल्याने निरर्थक अभिमान आणि अहंकार दूर होईल, इच्छुकांना संतान प्राप्ती होईल.
अध्याय ८
कायदे विषयक समस्या दूर होतील आणि कोर्ट केसेस मध्ये विजय मिळेल.
अहंकारी व्यक्तींचा अहंकार दूर होईल.
अध्याय ९
हट्टी दुराग्रही मित्रांचा प्रभाव कमी होईल. शत्रूंचा नाश होईल, चुकांची दुरुस्ती होईल किंवा त्यांचा परिणाम कमी होईल, महाराजांचे कुठ्ल्या तरी स्वरुपात किंवा स्वप्नात दर्शन होईल ( जर वार्धक्यामुळे किंवा आजारामुळे शेगावला तुम्ही जाऊ शकत नसाल )
अध्याय १०
आपल्या विरोधात कटकारस्थान करणाऱ्याची शक्ती/ प्रभाव कमी करण्यासाठी आजारपणातून लवकर ठीक होण्यासाठी हा अध्याय नक्की वाचावा.
अध्याय ११
ध्येयप्राप्ती व्हावी आणि अन्याय दूर होऊन न्याय मिळावा ह्यासाठी, स्वरक्षण होण्यासाठी, अपघात किंवा संकटातून वाचलो असल्यास महाराजांचे आभार मानण्यासाठी ह्या अध्यायाचे वाचन करावे.
अध्याय १२
आपल्या धंद्यात, उद्योगात, शेतीत चांगले उत्पादन, जास्त धनधान्य उत्पन्न होण्यासाठी, चांगल्या कार्यात यशप्राप्तीसाठी हा अध्याय नक्की वाचा.
अध्याय १३
कर्करोग अथवा तत्सम दुर्धर रोगांपासून मुक्तीसाठी, महापूर, वादळ, अग्नी इत्यादि नैसर्गिक आपत्ती/ संकटापासून रक्षण होण्यासाठी, त्याचा प्रभाव कमी होण्यासाठी अध्याय १३ वाचावा.
अध्याय १४
अचानक सांपत्तिक / आर्थिक हानी झाली असल्यास, अनभिग्न संकटांपासून रक्षणा साठी, नदी/ तलाव, पाण्याच्या धोक्यापासून बचाव होण्यासाठी हा अध्याय वाचावा.
अध्याय १५
आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःची ओळख आणि भरपूर प्रसिद्धीसाठी, काम, क्रोध, मद, मत्सर, राग, लोभादि षडरिपुंपासून दूर राहण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी, प्रमोशन मिळण्यासाठी, पगार वाढीसाठी असहनशील व्यक्तींनी सहनशीलता अंगी येण्यासाठी हा अध्याय नक्की वाचावा.
अध्याय १६
खूप मोठे ध्येय प्राप्त करण्यासाठी अति तीव्र डोकेदुखीचा त्रास होत असल्यास त्यातुन मुक्तीसाठी हा अध्याय वाचावा.
अध्याय १७
खोट्या/चुकीच्या आरोपातून मुक्तता व्हावी म्हणुन. दुसर्याकडून मत्सर आणि तत्सम संकटांपासून मुक्ती व्हावी म्हणुन हा अध्याय वाचावा.
अध्याय १८
महाराजांचा तिर्थ अंगारा घेऊन ह्या अध्यायाचे वाचन केल्यास शारीरिक व्याधी दूर होतील. इष्ट देवतेचे दर्शन होईल. साथीच्या रोगापासुन महाराज आपला व आपल्या परिवाराचा बचाव करतील.
अध्याय १९
ह्या अध्यायाच्या वाचनाने विवाह योग्य मुलामुलींना मनायोग्य जीवनसाथी मिळेल. स्वकष्ट व स्वसामर्थ्यावर विश्वास असणार्या भक्तांना काही कारणाने प्रमोशन मिळत नसेल प्रगती होत नसेल तर त्यांची प्रगती होईल.
अध्याय २०
ह्या अध्यायाच्या वाचनाने विवाहित जीवनात सफलता मिळेल, उद्योग धंद्यात झालेले नुकसान भरून निघेल, प्रकृती स्वास्थ्य लाभेल.
अध्याय २१
मनःशांती, आरोग्य, सुखसमृद्धी आणि मानसिक समाधानासाठी हा अध्याय वाचा आणि प्रचीती घ्या.
आरोग्यपुर्ण, सुखी, समृध्द, आनंदी जिवन हवे असेल तर शक्य होईल तेंव्हा श्री गजानन विजय ग्रंथाचे एकआसनी पारायण करावे. वेळेअभावी पुर्ण पारायण शक्य होत नसेल तर गुरुवारचे पारायण ह्या उपक्रमात अवश्य भाग घ्यावा.
श्री गजानन उपासनेबाबत अधिक माहिती हवी असल्यास मला संपर्क करावा.
|| गण गण गणांत बोते ||
गमभ शशिकांत दादा पोकळे ९७३७३४४४५६
संत गजानन महाराज भक्त परिवाराच्या वेगवेगळ्या उपासना नियमित सुरु असतात. परन्तु कधी कधी वेगवेगळ्या संकल्पनामधील फरक समजण्यात चुका होतात करिता खालील गोष्टी लक्षात घ्याव्या.
पारायण म्हणजे काय?
आपले गुरु, संत किंवा देव ह्यांच्या *अधिकृत चरित्राचे*, स्वेच्छेने, शुद्ध अंतःकरणाने, शांत चित्ताने, शुचिर्भूत राहून शक्यतो एका आसनावर बसून, पूर्णपणे रममाण होऊन वाचन-पठन करणे, संताची खरी ओळख करून घेणे, त्यांचे चरित्र, त्यांची शिकवण समजून घेणे आणि त्यांनी सांगितलेल्या / दाखवलेल्या नीतीच्या मार्गावर चालण्याचा पुरेपूर प्रयत्न करणे म्हणजेच पारायण.
*खाली दिलेल्या गोष्टीसारखा स्वार्थी हेतू मनात ठेऊन केलेले संतचरित्राचे वाचन पठण पारायण होत नाही*
• केवळ दुसरा करतो म्हणून केलेले वाचन पारायण होत नाही.
• दुसऱ्याची वाहवा मिळवण्यासाठी केलेले वाचन पारायण होत नाही.
• दुसर्या पेक्षा लवकर वाचतो हे दाखवण्यासाठी स्पर्धात्मक वाचन. पारायण होत नाही. भक्तिमार्गात स्पर्धेला जागा नाही.
• केवळ प्रसिद्धीसाठी केलेले वाचन पारायण होत नाही.
• मानधन व पैसा घेऊन केलेले वाचन पारायण होत नाही.
• बोध किंवा शिकवण न घेता केलेले वाचन पारायण होत नाही.
पारायणाचे विविध प्रकार
एकआसनी पारायण – एका दिवसात एकाच बैठकीत (न उठता) संपूर्ण २१ अध्यायाचे पारायण करणे. ही पारायणाची अत्यंत उत्तम पद्धती आहे. वाचणार्याच्या वाचन गतीनुसार पारायणासाठी ४ ते ५ तास लागतात. शुचिर्भूत राहून (मनाने व शरीराने शुद्ध पवित्र राहून) गुरुपुष्यामृत योगावर केलेल्या एक आसनी पारायणाचे विशेष महत्व संतकवी दासगणूनी सांगितले आहे.
*गुरुपुष्य योगावरी I जो याचे पारायण करी I बसून एक्या आसनावरी I राहुनिया शुचिर्भूत II*
एकदिवसीय पारायण - एका दिवसात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार २१ अध्यायाचे पारायण करणे. आजच्या धकाधकीच्या काळात बर्याच जणांना आरोग्याच्या समस्या असतात व त्यामुळे एक आसनी पारायण करणे शक्य होत नाही. म्हणून एक दोन ब्रेक घेऊन बरीच भक्तमंडळी पारायण करतात ते एकदिवसीय पारायण.
जागतिक पारायणदिनाला वरील दोनपैकी एका पद्धतीचा वापर करणे अपेक्षित आहे.
वेळेचे बंधन व व्यस्त जीवनप्रणाली ह्या गोष्टी लक्षात घेऊन आणखी काही पारायण पद्धतीचा वापर आपण करु शकतो.
तिन दिवसिय पारायण– तिन दिवस दररोज ७ अध्याय वाचून हे पारायण केल्या जाते. दशमी, एकादशी व द्वादशी च्या निमित्ताने केलेल्या तिन दिवसीय पारायणाचे विशेष महत्व संतकवी दासगणूनी सांगितले आहे. मंदिरांमध्ये अथवा घरी देखील असे पारायण आपण करू शकतो.
दशमी एकादशी द्वादशीला I जो हा ग्रंथ वाची भला I अनुपम येईल भाग्य त्याला I श्री गजानन कृपेने II
साप्ताहिक पारायण – सात दिवस दररोज ३ अध्याय वाचून हे पारायण केल्या जाते. महाराजांचा प्रकटदिन सप्ताह व संजीवन समाधीदिन सप्ताह च्या निमित्ताने अशा पारायणाचे मंदिरांमध्ये व घरी देखील सप्ताहाचे आयोजन करून असे पारायण आपण करू शकतो.
गुरुवारचे पारायण – गुरुवार हा महाराजांचा शुभदिन व २१ हा महाराजांचा शुभ अंक. २१ भक्तांचा ग्रुप तयार करून दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने एक अध्याय वाचावयाचा व सगळे मिळून २१ अध्याय वाचून पारायण पूर्ण करायचे. यामध्ये दर गुरुवारी एक पारायण व २१ गुरुवार मिळून प्रत्येक भक्ताचे एक पारायण पूर्ण होते असा द्विगुणीत लाभ मिळतो. एका ग्रुप मध्ये एकविस भक्तच भाग घेऊ शकतात हे ग्रुप पारायण असल्यामुळे पारायणाचे ठरवून दिलेले नियम पाळणे अतिशय महत्वाचे आहे. जे भक्त किंवा ग्रुप नियमांचे पालन करीत नाही ते पारायण पूर्ण होत नाही.
काही ठिकाणी भक्त ह्या उपासनेला चक्री पारायण किंवा साखळी पारायण असे संबोधतात हे चुकीचे आणि अयोग्य आहे
एकविस दिवसीय पारायण किंवा २१ दिवसीय पारायण – खूप जास्त भक्तांनी मिळून आणि ठरवून दररोज एक अध्याय (पहिल्या दिवशी सर्वांनी पहिला, दुसर्या दिवशी सर्वांनी दुसरा ... एकविसाव्या दिवशी सर्वांनी २१ वा अध्याय वाचणे) वाचन करून २१ दिवसात हे पारायण करावे. साधारण प्रकट दिवस व संजीवन समाधी दिनाच्या निमित्ताने भक्त एकत्र येऊन हि सेवा उपासना करतात. ह्यामधे भाग घेणाऱ्या भक्तांची संख्या कितीही असू शकते. येथे देखील प्रत्येकाने दररोज अध्याय वाचणे व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.
*संकीर्तन पारायण* – एका भक्ताला व्यासपीठावर बसवून त्याने ग्रंथाचे वाचन करणे व इतरांनी ते श्रवण करणे असे ह्या संकीर्तनाचे स्वरूप असते. हि एक श्रवण भक्ति आहे.
गजानन महाराजांचे बरेच भक्त असे आहेत की त्यांनी संपूर्ण श्री गजानन विजय ग्रंथ कंठस्थ केला आहे. हि सोपी गोष्ट नाही. व्यासपीठावर बसून जेंव्हा ते मुखोद्गत पारायण करतात त्यावेळी बरेचदा ते काही प्रसंगांचे निरुपण करतात, काही अनुभव सांगतात. हे पारायण ऐकणे म्हणजे एक आगळीवेगळी पर्वणीच असते. असे पारायण म्हणजे संकीर्तन पारायण.
सामुहिक पारायण – एकापेक्षा जास्त भक्तांनी एकाच दिवशी एकाच ठिकाणी एकाच वेळी पारायणाची सुरुवात करून आपापल्या गतीने ग्रंथ वाचन करून पारायण करणे. येथे प्रत्येकाने संपूर्ण ग्रंथ (२१ अध्याय ) वाचन करणे अपेक्षित आहे. प्रत्येकाच्या वाचन गतीनुसार वेगवेगळ्या वेळी पारायणाची सांगता होईल. हरकत नाही.
आपल्या परिवाराचे जागतिक पारायण आपण घरी किंवा अशाप्रकारचेच सामुहिक पारायण करतो.
काही आयोजक संकीर्तन पारायणालाच सामुहिक पारायण संबोधतात. परंतु माझे मते त्यात बराच फरक आहे.
संकीर्तन पारायणात प्रत्येक भक्त ग्रंथ वाचूच शकत नाही कारण त्याने व्यासपीठावरील भक्ताचे मुखोद्गत पारायण ऐकायचे आहे. त्यातच खरी मजा आहे. श्रवण आणि वाचन अशा दोन्ही क्रिया एकाच गतीने सोबत करणे जवळ जवळ अशक्य आहे. त्यामुळे इतर श्रोत्यांकडून अध्याय वाचनाची अपेक्षा करणे म्हणजे व्यासपीठावरील भक्ताचा सन्मान कमी करण्यासारखे आहे. त्यांचे वाचन व निरुपण आपण कसे ऐकणार कारण आपण तर पारायण करीत आहे. म्हणून अशा पारायणामध्ये चांगल्या प्रतीच्या ध्वनिक्षेपकाची व्यवस्था करून ते सुश्राव्य करावे. हे पारायण एकाच भक्ताचे ग्राह्य मानावे व इतरांनी जे केले ती श्रवणभक्ति.
दुसरे असे की प्रत्येकाची वाचन गती वेगवेगळी असते त्यामुळे सोबत वाचणे शक्य होत नाही.
बरेचदा फक्त काही भक्त पारायणाच्या सुरुवातीपासून असतात व बरेचसे भक्त हे उशिरा येतात. ते पारायण कसे पूर्ण करू शकतील? हा मोठा प्रश्न आहे. (यावर आयोजकांनी विचार करायला हवा) म्हणून जेंव्हा एकाच ठिकाणी खूप जास्त भक्तांनी पारायण करावे असे अपेक्षित असेल तर सामुहिक पारायण आयोजन करून प्रत्येकाला त्याच्या वाचन गतीनुसार पारायण करण्याची मुभा देणे आवश्यक आहे.
गण गण गणांत बोते
गमभ शशिकांत पोकळे दादा
९७३७३४४४५६
पाठीशी असता गजानन गुरु
व्यर्थ मी चिंता कशाला करू
श्री गजानन स्वामी चरित I जो नियमे वाचील सत्य I त्याचे पुरतील मनोरथ I गजानन कृपेने II
श्री गजानन विजय ग्रंथाची ओळख नसेल असा गजानन भक्त विरळाच. ह्या ग्रंथाची महती अवर्णनीयच आहे. गजानन महाराजांच्या भक्तांसाठी हा ग्रंथ म्हणजे एक कल्पवृक्षच. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्याचे विशाल सामर्थ्य ह्या ग्रंथाच्या वाचनांत आहे. संकटातून सुटका करण्याची किमया ह्या ग्रथाच्या वाचनाने घडू शकते. मात्र हे वाचन, पारायण मनोभावे, निरपेक्ष पणे, शुचिर्भूत राहून शांत चित्ताने आणि श्रद्धा ठेऊन करावे, प्रचीती नक्कीच मिळते असा भक्तांचा अनुभव आहे.
‘चैत्र मास प्रतिपदेला’ म्हणजेच गुढीपाडवा, आपल्या वर्षाच्या पहिल्या दिवशी हा ग्रंथ श्री संतकवी दासगणू यांनी लिहून श्री गजानन महाराजांना समर्पित केला. वर्षाची सुरुवात ह्या ग्रंथाच्या वाचनाने करणे अतिशय उत्तम.
श्री गजानन विजय ग्रंथाची ठळक वैशिष्टे
• संतकवी श्री दासगणू यांनी हा ओवीबद्ध काव्यमय प्रासादिक,रसाळ, भक्तिरसप्रधान ग्रंथ फारच सुगम, सुरेख, कुणालाही लगेच समजेल अशा भाषेत, वाचण्यास सरळ आणि सोपे, साधारण पाच ते सहा तासात सहज पारायण होईल संपेल अशा रीतीने लिहिला. ग्रंथ विनाकारण क्लिष्ट आणि मोठा होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे .
• ह्या ग्रंथाची मांडणी अतिशय मुद्देसूद आणि सुटसुटीत आहे. तो वाचतांना आपल्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष त्या घटना घडत आहेत अशी अनुभूती होते.
• हा ग्रंथ संपूर्ण खर्या संदर्भांवर आधारित आहे. संस्थान मध्ये उपलब्ध असलेल्या कागद पत्रांवर आधारित आहे. यामध्ये पदरचे काहीही घातले नाही असे श्री दासगणू लिहितात.
• अलीकडच्या काळात लिहिलेला आणि एवढ्या प्रचंड वाचकांकडून पठण केला जाणारा तसेच दररोज संपूर्ण पारायण करण्यात येत असलेला हा एकमेव ग्रंथ असावा असे भक्तांचे मत आहे.
• जीवनातील प्रत्येक समस्येवर ह्या ग्रंथाच्या एका अध्यायाच्या वाचनाने आपणास तोडगा निघतोच असा वाचकांचा आणि माझा विश्वास आहे. उदा. कुणी जर मृत्यू शय्येवर असेल तर अध्याय 3 वाचावा, संकट जर आदिदैविक स्वरूपाचे असेल तर नक्की अनुभव येईल. (मात्र अध्यात्मिक मृत्यू हा अटळ आहे हे विसरू नये.)
• गुरुपुष्यामृत योगावर ह्या ग्रंथाचे एक आसनी पारायण करण्याचा योग म्हणजे मनोकामना पूर्ण करण्याची आणि कुठलेही दु;ख दूर करण्यासाठी एक पर्वणीच आहे.
• श्री गजानन महाराज संस्थान तर्फे हा ग्रंथ अतिशय वाजवी दरात भक्तांना उपलब्ध केल्या जातो.
• ह्या ग्रंथाच्या अतिशय प्रसन्न वातावरणात आणि श्री गजानन महाराजांच्या सान्निध्यात शांततेने पारायण करण्याची सोय संस्थान मध्ये केली आहे. असे वातावरण घरी देखील मिळत नाही असा अनुभव आपण घेऊ शकता.
• इंग्रजी वर्षाच्या दुसर्या रविवारी जगभरातील बरेच गजानन भक्त ‘जागतिक पारायण दिवसा’ चे निमित्य साधून एकाच वेळी ( भारतिय वेळेनुसार सकाळी ६ वाजता) श्री विजय ग्रंथाच्या पारायणाची सुरुवात करतात व संपूर्ण ग्रंथाचे वाचन करतात.
• बरेचसे भक्त दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी, घराबाहेर जाण्यापूर्वी ह्या ग्रंथाचा एक अध्याय वाचन करतात.
• श्री संत गजानन महाराज संस्थान शेगांवचे त्यावेळचे व्यवस्थापक श्री रामचंद्र पाटील यांनी १९३९ मधे महाराजांच्या जिवनावर आणि त्यांच्या लीलांवर आधारित कागदपत्रे संकलीत करून त्या कागदपत्रांचे आधारे संतकवी दासगणू यांना विनंती करून हा सत्य ग्रंथ लिहून घेतला आहे.
• ग्रंथ लिहिण्याआधी श्री दासगणु महाराजांनी त्यांच्या कडे दिलेली सर्व कागदपत्र खरी आहेत याची व्यवस्थापकीय मंडळी व शेगांव येथील भक्तांना बोलवून व विचारून खातरजमा करून घेतली होती म्हणूनच श्री दासगणू सांगतात हा ग्रंथ ना कादंबरी I ती गजाननाची लीला खरी I येथे जो अविश्वास धरी तो बुडेल नि:संशय II
• श्री दासगणु महाराजांनी फक्त प्रवास खर्चाव्यतिरिक्त कुठलेही मानधन न घेता ह्या सुगम्य ग्रंथाच्या लिखाणाची सेवा दिली होती. त्यांनी संस्थानने दिलेले मानधन स्विकारले नाही फक्त श्रीफळ व प्रसाद घेतला होता.
• असा हा भक्तांना प्रिय असलेला *श्री गजानन विजय ग्रंथ* श्री दासगणू ह्यांनी सलग एकवीस दिवसात एकवीस अध्याय ओवीबद्ध करून चैत्र शुद्धप्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला गजानन कृपेने पूर्ण केला.
गण गण गणांत बोते
गमभ शशिकांत पोकळे दादा
९७३७३४४४५६
पाठीशी असता गजानन गुरु
व्यर्थ मी चिंता कशाला करू
संत हेच भूमीवर I चालते बोलते परमेश्वर I वैराग्याचे सागर I दाते मोक्ष पदाचे II
संत हे प्रति परमेश्वरच असतात हीच आपली मान्यता. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर ह्या षडरीपुंवर ज्यांनी विजय प्राप्त केला ज्यांच्या मनात सर्व प्राणी मात्रांवर सदैव प्रेम आणि दया असते तेच खरे संत.
“जगाच्या कल्याणा संताच्या विभूती” असे जे म्हटले जाते ते काही उगाच नाही. संताच्या मनात जगातील सर्वांच्या कल्याणाची सदिच्छा सतत असते. परोपकार करणे हा संताचा एक मोठा सद्गुण असतो. परमेश्वर जसे भक्ताचे रक्षण करीत असतो तेच कार्य भूतलावर संत करत असतात. परमेश्वराचे सदैव अखंड चिंतन आणि भक्तांचे रक्षण हेच ज्यांचे ध्येय तेच संत.
सद्गुणांचे माहेर आणि दुर्गुणांचा कर्दनकाळ म्हणजेच संत. संत म्हणजे आपल्या भक्तांसाठी जणू कामधेनूच. भक्तांच्या इच्छा पुरविण्यास संत नेहमी सज्ज असतात. अनाथांचे नाथ ते संत.
आध्यात्मिक वृत्तीच्या भाविकांच्या मनात भक्तिमार्गाचे बीज अंकुरित करून त्यांच्याकडून उपासना करून घेणे आणि जगाच्या कल्याणार्थ त्यांच्या सेवेचा उपयोग करून घेणे हे संतांना चांगले जमते. भावीक वृत्तीच्या श्रीमंत माणसांच्या मनात दातृत्वाची भावना निर्माण करून गरजू भक्ताच्या गरजा भागविणे, भक्तिमार्गाचे संगोपन करणे, त्याचा प्रचार प्रसार करणे हे खरे संतच करू शकतात.
शेगांवचे संतरत्न श्री गजानन महाराज
महाराष्ट्राला संत पुरुषांची महान परंपरा लाभलेली आहे. आपल्या महाराष्ट्राला तसेच भारत वर्षाला संतांची खाण म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. म्हणूनच आपल्या देशातील लोकांची विचारसरणी पाश्चिमात्य विचारसरणी पेक्षा वेगळी आहे. ज्या समाजात संत तेथे नीती, प्रेम, सदाचार, सुदैव, समृद्धी, आरोग्य आणि मानवता. आसक्ती मोह माया मद मत्सर यापासून दूर राहण्याची शिकवण भारतात ह्या गोष्टी प्रखरतेने दिसतात आणि वेळोवेळी त्यांचा अनुभव घेतल्या जाऊ शकतो.
महाराष्ट्र राज्यातील विदर्भात असेच एक दैदिप्यमान संतरत्न दि. २३ फेबृवारी १८७८ ह्या दिवशी (माघ वद्य सप्तमी) शेगाव येथे प्रकट झाले. भर दुपारच्या वेळी देविदास पातुरकरांच्या घराबाहेर उष्ट्या पत्रावळी वरील अन्नकण वेचून खात त्यांनी “अन्न हे पूर्णब्रम्ह” हा अतिमहत्वाचा पहिला संदेश आपणाला सर्वांना दिला. भक्त बंकटलाल आणि दामोदरपंत ह्या भक्तद्वयांनी महाराजांच्या संतत्वाला ओळखले.
श्री गजानन महाराजांचे भक्त हे त्यांना दत्तात्रयांचा अवतार म्हणजेच दत्त संप्रदायातील संत मानतात. संतकवी दासगणू लिखित श्री विजय ग्रंथामध्ये श्री गजानन महाराज हे समर्थ रामदास स्वामीचे अवतार असल्याचा उल्लेख आहे. परंतु महाराज नक्की कुठून आले, ह्याबद्दल कुणालाच काहीही माहिती नाही. महाराजांनी स्वतः हि कधी ह्या विषयावर चर्चा केली नाही.
सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी , रापलेला तांबूस वर्ण , तुरळक दाढी व केस , वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात यातून साकारते ती श्रीगजानन महाराजांची देहचर्या . लांब लांब पावले टाकीत सदानकदा घाईघाईत धावल्याप्रमाणे भासणारी चालगती , पाय अनवाणी आणि हाती असलीच तर एखादी चिलीम व त्यास छापी ( कपडा ) गुंडाळलेली. महाराजांची अशी मूर्ती लगबगीने एखाद्याच्या घरात घुसत असे किंवा अंगणात ओसरीवर मुक्काम ठोकीत असे. मग घरधन्याने भाकरतुकडा दिला तर खावे अन्यथा तो तसाच ठेवून पुढील मुक्कामी पळावे , अशी बालसुलभ वृत्ती.
३२ वर्षाच्या अल्पशा परंतु प्रभावशाली जीवनकालात गजानन महाराजांनी आपल्या अनाकलनीय अशा लिलांनी त्यांच्या अनेक भक्तांवर कृपा केली.
काडेपेटी शिवाय स्वसामर्थ्याने अग्नी प्रज्वलित करणे, नासलेले चिंचवणे चांगले करून जानकीराम सारख्या नास्तिकाला सन्मार्गी लावणे, निर्जल विहिरीला पाणी निर्माण करणे, सुकलालाची द्वाड गाय किंवा गोविन्द्बुवाचा द्वाड घोडा असो किंवा विठोबा घाटोळ सारखा मतलबी भक्त असो सर्वांना वठणीवर आणण्याचे काम अशा एक नाही असंख्य अनाकलनीय लीला महाराजांनी केल्या. तसेच अकोलीमध्ये कावळ्यांना ते ठिकाण वर्ज्य करण्याचे सांगून पशुपक्षी देखील संतांच्या आज्ञेत वागतात हे दाखवून दिले. आपल्या भक्तांचे वेळोवेळी रक्षण करणे, त्यांच्या मनोकामना पूर्ण करणे, संकटातून वाचवणे, नास्तिक लोकांना अनुभूती देवून त्यांना सन्मार्गी लावणे आणि समाजहितासाठी भक्तांना उपदेश देणे अशी बरीच विधायक कामे महाराजांनी केली. त्यांनी अशा अनेक अलौकिक लीला करून भक्तांना आपल्यातील संतत्वाची वेळोवेळी प्रचीती घडवून दिली. परंतु आपल्या भक्तांना भक्तिमार्गामध्ये पुष्ट करण्यासाठीच ह्या लीला त्यांनी घडवून आणल्या, अन्य कुठलाही हेतू त्यामध्ये नव्हता. संताचा जन्म हा परमेश्वराचं अस्तित्व पटवून देण्यासाठी असतो संतांनी दाखविलेल्या लीला समजण्यास सोप्या असल्यामुळे नीतिधर्माच्या मार्गावर सामान्य माणसाची लवकर निष्ठा बसते.
मी गेलो ऐसे मानु नका I भक्तीत अंतर करू नका I कदा मजलागी विसरू नका I मी आहे येथेच II
पंढरपूरच्या विठ्ठलाची अनुमती घेऊन महाराज दि ८ सप्टेंबर १९१० (ऋषीपंचमी) ला समाधिस्त झाले. महाराजांच्या भक्तांना त्यांच्या समाधिस्त होण्यामुळे अतोनात दुःख झाले. त्या नंतर बर्याच भक्तांच्या मनांत आता शेगांवात काही राहले नाही, आपले महाराज आता समाधिस्त झाल्यामुळे आपल्या पाठीशी कसे असणार, आपले रक्षण कसे करणार अशी शंका निर्माण झाली. परंतु महाराजांनी समाधी नंतर देखील आपल्या भक्तांना दर्शन दिले, प्रचीती दिली. लक्ष्मण हरी जांजळ यांना मुंबईच्या बोरीबंदर रेल्वे स्थानकावर (आजचे सी एस टी) आणि यादव गणेश सुभेदार यांना वर्धेला दर्शन देऊन त्यांचे प्रबोधन केले. महाराजांनी संजीवन समाधी घेतली त्यामुळे महाराजांची ज्योती अजूनही आपल्यामध्ये अस्तित्वात आहे हे आपण नेहमीच अनुभवतो. आज सुध्दा ज्यांचा महाराजांवर विश्वास आहे त्यांच्यावर महाराजांची कृपा आहेच असा भक्तांचा अनुभव आहे.
भक्तांवर कृपा करुन त्यांच्या संकटाचे निरसन महाराज आजही करतात, भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. असा भक्तांचा अनुभव आहे आणि अनुभवामुळेच दृढविश्वास आहे. आजही जेंव्हा भक्त मनोभावे हाक मारतात तेंव्हा महाराज त्यांच्या हाकेला आवर्जून ओ देतात. आजही श्री गजानन महाराजांच्या केवळ स्मरणाने जीवनातील समस्या, संकटे आणि अडचणीचे निवारण होते. महाराजांची महिमा अपरंपार आहे. जे कोणी भक्त त्यांना श्रध्देनी आणि निष्ठेने शरण जातात त्यांची कधीच निराशा होत नाही.
आणि विशेष म्हणजे श्री गजानन महाराजांची आराधना अतिशय साधेपणाने करायची असते. त्यामुळे सर्व साधारण भक्तही ती कुणाच्याही मदती शिवाय करू शकतात.
अशा ह्या ब्रम्हांडनायक योगीराजाचे सार्थक चरित्र संतकवी श्री दासगणू महाराजांनी अतिशय ओघवत्या, सरळ, सोप्या मराठी भाषेत “श्री गजानन विजयग्रंथ” ह्या नावाने आपल्या सर्वांच्या भल्यासाठी लिहून ठेवलेले आहे. कालांतराने महाराजांच्या अमराठी भक्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन ग म संस्थानने इतर भाषेमध्ये देखील ह्या ग्रंथाचे अनुवाद करून घेतले आहेत. हे सर्व भाषेतील ग्रंथ अत्यल्प दरात ग म संस्थान शेगाव येथे उपलब्ध आहेत. संत गजाननाच्या भक्तांनी हा अधिकृत श्री गजानन विजय ग्रंथच पारायणासाठी वाचावा असा संत गजानन भक्त परिवाराचा नेहमीच आग्रह असतो.
संत गजानन महाराजांची कार्यभूमी असलेले आणि समाधीस्थळ असलेले शेगांव येथील देवस्थान अतिशय एक आगळेवेगळे संस्थान आहे. तेथील सेवेकर्यांचा सेवाभाव, परिसरातील स्वच्छता, व्यवहारातील पारदर्शिता, कौशल्यपूर्ण व्यवस्थापन, भक्तांना केंद्रस्थानी ठेऊन त्यांच्या सोईसाठी करण्यात येणारे प्रयत्न आणि अशाच अनेक वैशिष्ट्यांमुळे शेगांव संस्थान हे जगातील एकमेव देवस्थान ठरते. एकदा का आपण शेगांवला गेलो कि तेथील व्यवस्थापनाच्या आणि तेथील व्यवस्थेच्या प्रेमात आपण पडल्याशिवाय रहात नाही. तेथे पाऊल ठेवताक्षणी होणारा आनंद आणि समाधान शब्दात सांगता येत नाही या वातावरणातील वायूमंडल आपल्या मनातील सर्व कलुषित भाव नाहीसा करतं. तेंव्हा प्रत्येकाने शेगांव संस्थान ला एकदा भेट द्यावीच असा आमचा प्रेमाचा आग्रह आहे.
गण गण गणांत बोते
गमभ शशिकांत पोकळे दादा
९७३७३४४४५६
पाठीशी असता गजानन गुरु
व्यर्थ मी चिंता कशाला करू
जय गजानन!
श्री संत गजानन महाराज भक्त परिवाराची स्थापना २१ जानेवारी २००८ ला गमभ शशिकांत पोकळे दादांनी केली. तेव्हापासूनच गुरुवारचे पारायण हा सामुहिक पारायणाचा उपक्रम सुरु आहे.
सध्या फेसबुकवर ‘संत गजानन महाराज भक्त परिवार” हा ग्रुप आहे आणि त्याची भक्तसंख्या ३६,००० (छत्तिस हजार ) पेक्षा जास्त आहे. परिवाराच्या बऱ्याच उपासना चालतात. त्यातलीच एक म्हणजे “गुरुवारचे पारायणा” ही एक अतिशय लोकप्रिय उपासना आहे. सध्या “गुरुवारचे पारायणा” चे ३९५० पेक्षाही जास्त ग्रुप्स आहेत आणि असे नविन पारायण ग्रुप नियमित तयार होत असतात.
आजचं जीवन फार धकाधकीचं आहे. सर्व जण आपआपल्या व्यवहारिक जिवनांत, संसारात, नोकरीत खूपच बिझी असल्याचे सांगतात. प्रत्येकाला भौतिक साधनं पाहिजे असतात परंतु अध्यात्म आणि परमार्थ यासाठी कुणाकडेच वेळ नाही. संतकवि दासगणु महाराजांच्या भक्तीने ओतप्रोत असलेल्या लेखणीतून साकार झालेल्या श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण जिवनात सर्व सुख, सोई, आरोग्य, समृद्धी आणि भौतिक सुख प्रदान करणारा एक सरळ सोपा भक्तीमार्ग आहे. परंतु एक आसनीं पारायण करण्या करिता जवळ जवळ ४ ते ५ तास लागतात. म्हणून इच्छा असूनही दर गुरुवारी भक्तांना श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण वेळ नसल्यामुळे करणे शक्य होत नाही. अश्या भक्तांना महाराजांच्या सेवेचा लाभ घेता यावा आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात ह्या दृष्टीने गुरुवारचे पारायण ही संकल्पना २००८ मध्ये शशिकांत पोकळे दादा यांनी साकारली. ह्या उपासनेला आपल्या गजानन महाराजांचा आशिर्वाद प्राप्त आहे.
गजानन भक्तांचा असा अनुभव आहे की हा एक योग्य पर्याय आहे. ह्या संकल्पनेला भक्तांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि मिळतच राहील. विशेष म्हणजे भगिनींचा ह्या सेवेत खूप मोठा सहभाग आहे.
ह्या सेवे मध्ये दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने दर गुरुवारी फक्त एकच अध्याय वाचावयाचा आहे त्यामुळे १२ ते १५ मिनिटांचीच ही भक्ती सेवा आहे. फक्त १७ ते २१ अध्याय वाचणाऱ्या भक्ताला २५ ते ३५ मिनिटे लागू शकतात. आपल्या गावात असलेल्या किंवा आपल्या संपर्कात असलेल्या २१ गजानन भक्तांचा एक ग्रुप तयार करावा. आजच्या प्रगत युगात भक्तांशी फोन आणि वाटसअप सारख्या संचार माध्यमाने लवकर संपर्क करता येतो त्यामुळे भक्त जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी ते गुरुवारच्या पारायण ग्रुप मध्ये भाग घेऊ शकतात आणि कुणीही एक भक्त ग्रुपचे संयोजन करू शकतो.
ह्या ग्रुपला श्री गजाननाच्या एका भक्ताचे किंवा गजानन महाराजाच्या संबंधित समर्पक नाव द्यावे. त्यातील एका भक्ताने संयोजक बनावे. संयोजकाने शक्य असल्यास त्या एकविस भक्तांचा एक वाटसअप ग्रुप तयार करावा. नसेल तर फोन द्वारे संपर्क करता येतो.
संयोजकाने मंगळवारी दुपारनंतर परंतु बुधवारी सकाळी ११ पर्यंत अध्यायाचे वाटप करून प्रत्येक भक्ताला त्याचा अध्याय कळवावा.
प्रत्येक भक्ताने हा अध्याय दर गुरुवारी पहाटे ५ ते रात्री ८ ह्या दरम्यान वाचून पूर्ण करावा व वाचून झाल्याचे आपल्या संयोजकाला कळवावे. रात्री ९ वाजेपर्यंत संयोजकाने सर्व २१ अध्यायाचे वाचन झाले याची खात्री करून घ्यावी व तसे मला ९:१५ पर्यंत कळवावे.
काही कारणाने कुणी अध्याय वाचू शकत नसेल तर त्याने त्याच्या घरच्या कडून तो वाचून घ्यावा. तेही शक्य नसेल तर सकाळीच त्याने आपल्या संयोजकास तसे कळवावे. संयोजकाने दुसऱ्या भक्ताकडून तो अध्याय वाचून घ्यावा अथवा स्वतः वाचावा.
हे पारायण महाराजांच्या फोटो समोर बसून, पुर्ण श्रध्देने, शुुचीर्भूत राहून आणि शुद्ध अंतःकरणाने करावे. भक्तीचे फळ नक्की मिळेल. कुठलीही समस्या संकट दूर करण्याचे सामर्थ्य ह्या गुरुवारच्या पारायणात आहे.
ह्या पारायणात इच्छा असेल तरच भाग घ्यावा दुसरा करतो म्हणून मी पण करणार अशी स्पर्धा करण्याची आवश्यकता नाही.
हे ग्रुप पारायण असल्यामुळे प्रत्येक गुरुवारी सगळे २१ अध्याय वाचून होणे अतिशय गरजेचे आहे म्हणजेच प्रत्येकानेच अध्याय वाचायचा आहे. पारायण पूर्ण न झाल्यास ज्याने अध्याय वाचला नाही त्या भक्ताची ही जबाबदारी ठरते. पुढच्या गुरुवारी प्रत्येकाने पुढील अध्याय वाचावा म्हणजे ज्याने पहिल्या गुरुवारी ७ व अध्याय वाचला त्याने पुढच्या गुरुवारी ८ वा व त्यानंतर ९ वा, १० वा असा क्रम सुरु ठेवावा. अध्याय २१ नंतर परत अध्याय १, २, ३ असे वाचन करावे. फक्त एकदा एकविस अध्याय वाचून झाले म्हणजे ग्रुप बंद होत नाही. ही पारायण सेवा गजाननाच्या कृपेने अखंड चालू असते.
काही कारणाने ग्रुप पारायण सोडायचे असल्यास संयोजकाला तसे कळवावे. संयोजक त्या ग्रुप मध्ये दुसऱ्या भक्ताला जागा देईल व ग्रुप पूर्ण करेल.
गुरुवारचे पारायणात हजारोंच्या संख्येने भक्त जुळले आहेत. आणि तुम्ही ह्या ग्रुप साधनेचा हिस्सा आहात हि फार पुण्याची गोष्ट आहे. तुमची हि सेवा महाराजांना नक्कीच आवडेल आणि तुम्हाला ह्या सेवेचे फळ देखील नक्कीच मिळेल यात शंका नाहीच. पण एवढे नक्की करा.
• पारायणासाठी श्री दासगणू विरचित गजानन विजय ग्रंथच वाचावा. दुसरा कोणताही ग्रंथ किंवा स्तोत्र पारायणासाठी चालणार नाही. ग्रंथ संस्थान मधूनच घ्यावा.
• एकदा पारायणात भाग घेतल्यानंतर नियमितपणे अध्याय वाचणे आवश्यक आहे. अध्याय वाचणे हि आपली स्वतःची जबाबदारी आहे, संयोजकाची नाही हे समजून घ्या. हि तुमची उपासना आहे आणि महत्वाचे म्हणजे हि ग्रुप साधना आहे. तुमच्यामुळे ग्रुपचे पारायण अपूर्ण राहू नये ह्याची काळजी घ्या.
• आपल्या ग्रुपचे नाव, आपल्या संयोजकाचे नाव आणि फोन नंबर आपल्याकडे नक्की ठेवा. अध्याय वाचना संबंधी मेसेज आणि माहिती तुमच्या ग्रुपवर टाका किंवा तुमच्या संयोजकालाच द्या.
( बरेच भक्त मला मेसेज पाठवतात. पण ३९५० पेक्षा जास्त ग्रुप असल्यामुळे तुम्ही नेमके कोणत्या ग्रुप मध्ये आहे हे लवकर कळत नाही, वेळ वाया जातो व पुढे कळवणे शक्य होत नाही.)
•ठरवलेल्या वेळेतच अध्याय वाचा आणि अध्याय वाचल्याचा मेसेज ग्रुप वर नक्की टाका म्हणजे संयोजक पारायण पूर्ण झाल्याचे पुढे कळवतील. वाटसअप बंद असेल तर संयोजकाला फोन किंवा मेसेज नक्की करावा.
• छोट्या मोठ्या कारणासाठी अध्याय वाचू शकणार नाही असा मेसेज टाकू नका. बाहेरगावी जात असाल तर पाकीट साईझ गजानन विजयग्रंथ सोबत ठेवा अथवा सोफ्ट कॉपी सोबत ठेवा. अध्याय वाचण्याचा १०० % प्रयत्न करा. याउपरही शक्य होत नसेल तरच घरच्या कुणाला किंवा ग्रुपच्या मेम्बरला अध्याय वाचनाची विनंती करा. दुसर्याला अध्याय वाचायला लावण्याची वेळ वारंवार येऊ नये अशी महाराजांना प्रार्थना करा.
• सकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत अध्याय वाचावा. रात्री ८ नंतर अध्याय नक्की वाचणार असाल तर तसे संयोजकाला आधीच कळवा. संयोजकाचा तुम्हाला मेसेज करण्याचा त्रास कमी होईल.
• एकदा ग्रुप जॉईन केला म्हणजे ग्रुप मध्ये रहावेच लागेल अशी सक्ती नाही. पण हि उपासना एवढी सुलभ आहे की ग्रुप सोडायची इच्छाच होत नाही असा भक्तांचा अनुभव आहे. काही अपरिहार्य कारणाने ग्रुप सोडायचाच असेल तर तशी पूर्व सूचना संयोजकाला द्यावी.
मी गेलो ऐसे मानु नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मजलागी विसरू नका, मी आहे येथेच* – श्री गजाननविजय
आपल्या श्री गजानन महाराजांच्या पारायणरूपी सेवेची माळ न तुटता अखंड राहो हाच प्रयत्न आपल्याला सगळयां भक्तांना करायचा आहे. महाराज आपल्या सोबत नेहमी आहेतच. काही शंका असल्यास आपल्या संयोजकाशी अथवा माझेशी ९७३७३४४४५६ वर फोन करून संपर्क करावा.
गण गण गणांत बोते
गमभ शशिकांत पोकळे दादा
९७३७३४४४५६
पाठीशी असता गजानन गुरु
व्यर्थ मी चिंता कशाला करू